Marathit Logo महाराष्ट्रातील किल्ले ~ Marathit

महाराष्ट्रातील किल्ले


‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’
या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. आहे.

महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. या डोंगर रांगांतील किल्ले हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यांविषयीची माहिती पुढीलप्रमाणे -
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांची सूची
जिल्हा किल्ल्याचे नाव
रायगड रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा
पुणे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी
सातारा प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी.
कोल्हापूर पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी.
ठाणे वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड इत्यादी.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड  इत्यादी.
रत्नागिरी सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी.
अहमदनगर हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला.
औरंगाबाद देवगिरी (दौलताबाद) किल्ला.
नाशिक ब्रह्मगिरी, साल्हेर - मुल्हेर इत्यादी.
वरीलपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांची तपशीलवार माहिती पुढे देत आहोत.
रायगड -
‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेक झाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्‍या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते.

छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तू आहेत. गडाला सुमारे १४०० पायर्‍या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडला मातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्‍या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली.
राजगड -
गडांचा राजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.

अतिशय दुर्गम किल्ला म्हणून आजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पण तरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जो तह केला होता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्या वेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्ध किल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.
शिवनेरी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.

शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला ती वास्तू, शिवाई मंदिर, हत्ती दरवाजा, शिवबाई दरवाजा, बदामी तलाव इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटले जाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या  गार  पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत. किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये सिंहारूढ असलेल्या ‘मातोश्री जिजाबाई’ व तलवार घेऊन बसलेले बाल शिवाजी यांची पंचधातूची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून ९४ कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. गडावर भोजन व निवासाची व्यवस्था आहे.
सिंहगड -
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला हा सिंहगड किल्ला  पुण्यापासून फक्त २४ कि. मी. अंतरावर आहे. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. इ. स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वत:चे बलिदान देऊन हा किल्ला  स्वराज्यात दाखल केला. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार काढले. तेव्हापासून कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले.

समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मी. उंचीवर हा किल्ला  आहे. गडावर नरवीर तानाजींची समाधी, कल्याण दरवाजा, राजारामांची समाधी, अमृतेश्वर मंदिर इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा बंगलाही गडावर आहे. पेशवाईच्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे. लोकमान्य टिळक चिंतन-मनन, अभ्यास व लेखनासाठी, तसेच विश्रांतीसाठी सिंहगडावर वारंवार येत असत. शिवकाळ - पेशवाई - स्वातंत्र्य लढा या तिन्ही काळात हा महत्त्वाचा होता. गडावरून खडकवासला धरण, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे) दृश्य पाहावयास मिळते. पुणे शहराच्या अगदी जवळ असा हा किल्ला  असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
प्रतापगड -
शाहीर तुळशीदास यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’ राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला  म्हणजे प्रतापगड. प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ ते १६५८ या २ वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले. मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली हा गड बांधला गेला. सह्याद्री पर्वत रांगेत व जावळीच्या खोर्‍यात घाटमाथ्यावरती हा गड आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे.

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध महाराजांनी याच ठिकाणी केला. या वेळी झालेल्या घनघोर लढाईत, खानाच्या प्रचंड सेनेचा सामना करताना महाराजांनी गनिमी कावा तंत्राचा अतिशय हुशारीने वापर केला. प्रतापगडावर अनेक शिवकालीन मंदिरे आहेत. भवानी मातेचे मंदिर, छत्रपतींचा पुतळा ही स्थाने या ठिकाणी आहेत. जवळच महाबळेश्र्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असून पुण्यापासून १३७ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून बसेसची सोय आहे. गडाच्या पायथ्याशी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
पुरंदर -
पुरंदर पाहिला की, काही गोष्टी डोळ्यासमोर येतात. धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म, सवाई माधवराव यांचा जन्म, दिलेरखानानी किल्ल्याभोवती दिलेला वेढा, मुरारबाजींची शर्थीची लढाई इ. प्रसंग आठवतात. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मी. इतकी आहे. १६६५ साली दिलेरखानानी किल्ल्याला वेढा दिला होता. त्या वेळी केवळ ७०० मावळे हाताशी घेऊन मुरारबाजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वराज्यासाठी बलिदान दिले. पुरंदर ही अगदी सुरुवातीच्या काळात पेशव्यांची राजधानी होती.

पुरंदर गडावर केदारेश्वर, रामेश्वर, पेशव्यांचा वाडा, खांदकडा इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच गडावरील शेंड्या बुरूज, हत्ती बुरूज, मुरवी तलाव, राजाळे तलाव, मुरारबाजीचा पुतळा ही स्थानेही इतिहास जिवंत करतात. पुरंदर गडावरून आजुबाजुला नजर टाकली की, वज्रगड, सिंहगड, राजगड, विचित्रगड या किल्ल्यांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळते.

सध्या पुरंदर हा किल्ला  राष्ट्रीय छात्रसेना प्रबोधिनीच्या ताब्यात असून तेथे प्रशिक्षण कार्यक्रम होतात. नीरा व कर्‍हा या नद्यांच्या मध्ये वसलेल्या पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्याहून एस.टी. ची सोय आहे. पुण्यापासून ३८ कि. मी. अंतरावर सासवड (पुरंदर) तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी केतकावळे या गावी `प्रतिबालाजी' हे  सुंदर मंदिर आहे.
सिंधुदुर्ग -
मुरुड-जंजिर्‍याच्या विजयाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय. १६६४ ते १६६७ च्या दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. ४८ एकराचा किल्ल्याचा परिसर असून, किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. मोठे दगड व सुमारे ७२,५७६ कि. गॅ‍. लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. मराठ्यांचा हा महत्त्वपूर्ण किल्ला होय. किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून अनेक पोर्तुगीज तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. सुमारे ३०० कामगार यासाठी सतत ३ वर्षे अहोरात्र झटत होते. किल्ला बांधण्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता.

किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत. किल्ल्यात जाण्यासाठी मालवणहून बोटीच्या साहाय्याने जाता येते.
पन्हाळा -
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्‍यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून विशाळगडावर पोहोचले. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार - पन्हाळा!

पन्हाळ्याची उंची साधारणत: ८५० मी. आहे व घेर ८-९ कि. मी. आहे. वाघ दरवाजा, तीन दरवाजा, चार दरवाजा असे दरवाजे गडावर आहेत. गडावर मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. त्यात गंगा व सज्जा कोठी ही महत्त्वाची धान्याची कोठारे आहेत. कविवर्य मोरोपंताचे जन्मस्थान, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा तसेच शिवा काशीद यांचाही पुतळा इत्यादी महत्त्वाची ठिकाणे गडावर आहेत. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूर येथे शिवा काशीद यांची समाधी आहे. छत्रपतींना सिद्धीच्या वेढ्यातून सोडवताना शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान तसेच महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी केलेली पराक्रमाची शर्थ हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच. महाराणी ताराबाई यांनी काही काळ कोल्हापूर गादीची राजधानी म्हणून पन्हाळा येथून कारभार पाहिला.

कोल्हापूर शहरापासून २० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. जवळच जोतिबाचे मंदिर (जोतिबाचा डोंगर) आहे. निसर्गसंपन्नतेने नटलेल्या या किल्ल्यावर अगदी शेवटच्या टोकापर्यंत गाडी जाते. किल्ल्यावर राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. अनेक हॉटेल्स, लॉजेस गडावर आहेत. गडावर जणू एक गावच वसलेले आहे. विशेष बाब म्हणून शासनाने येथे गिरीस्थान नगरपरिषद स्थापन केलेली आहे.
तोरणा -
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १४०४ मी. आहे. गडावर जाण्याकरिता अतिशय अरुंद, अवघड अशी वाट आहे, आजही सरळ-सोपी, पायर्‍या-पायर्‍यांची वाट नाही. काही लोखंडी गज मार्गावर रोवलेले आहेत. त्या गजांचा आधार घेत गड चढावा लागतो. ह्या गडाची चढण गिर्यारोहणाचा आनंद देते. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो. एका इंग्रज अभ्यासकाने, ‘‘सिंहगड ही सिंहाची गुहा अन् तोरणा हे गरूड पक्षाचे घरटे आहे’’, असे उद्गार या गडाबद्दल काढले आहेत. या किल्ल्यावर बांधकाम करत असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले, ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी झाला.

तोरण गडावर श्री तोरणाजाई मंदिर, बिनी दरवाजा, गंगाजाई मंदिर, झुंजारमाची टकमक बुरुज, बालेकिल्ला, कोकण दरवाजा, हनुमान बुरुज, वेताळ इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. बालेकिल्ल्यावरून पूर्वेस पाहिले की, सिंहगड, पुरंदर, खडकवासला धरण, रायरेश्वर इ. भाग दिसतो, तर पश्चिमेकडील बाजूस, प्रतापगड, मकरंद गड व लांबवरचा रायगडही दिसतो.

भोर संस्थानातर्फे अश्विन महिन्यात नवरात्रीच्या कालावधीत गडावर मोठा उत्सव भरतो. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे. पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी सतत गाड्या आहेत.
विशाळगड -
विशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची ‘पावनखिंड’ झाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळ, फुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधी, राजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारक, सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गजापूर’ या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाची, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक पन्हाळा - ते - विशाळगड असा प्रवास करतात.
दौलताबाद (देवगिरी) -
यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला  नाही. महम्मद तुघलकने या देवगिरीचे ‘दौलताबाद’ नाव केले. १५२६ पर्यंत इथे बहामनी सत्ता होती. त्यानंतर औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा किल्ला  ‘मुघलांकडे’ होता. सुमारे २०० मी. उंचीवर हा किल्ला  आहे. किल्ल्याला ७ वेशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहे, त्याचबरोबर हत्ती हौद, भारतमातेचे मंदिर, चिनी महाल, मीठ अंधेरी मार्ग, खंदक इ अनेक ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठीचा मनोरा हे एक वैशिष्ट्य येथे बघता येते. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणार्‍या राजाला तो लढून जिंकता आला नाही.

औरंगाबादपासून फक्त १३ कि. मी. अंतरावर हा किल्ला  आहे.  औरंगाबादपासून वाहनांची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे. जवळच अजिंठा-वेरुळच्या लेणी, घृष्णेश्र्वर मंदिर ही ठिकाणे आहेत.

सज्जनगड -
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. समर्थांनी या गडावर बराच काळ घालविला व शेवटी याच गडावर त्यांनी समाधी घेतली. इ.स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतला. पूर्वी या गडाचे नाव परळी होते. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले.

किल्ल्याला प्रमुख दोन दरवाजे आहेत. गडावर श्रीराम मंदिर, श्रीसमर्थांची समाधी, श्रीधरस्वामींची कुटी, अंगलाईचे देऊळ, त्याचबरोबर समर्थांनी वापरलेल्या काही वस्तूही गडावर पाहावयास मिळतात. गडावर गेल्यावर अगदी प्रसन्न व पवित्र वातावरण अनुभवण्यास मिळते. ‘श्रीराम नवमीचा’ उत्सव गडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गडावर भाविकांकरिता निवासासाठी खोल्या बांधल्या आहेत. तेथे भाविकांना भोजनाचीही सोय करण्यात येते. निसर्गाने नटलेल्या परिसरात सज्जनगड हा अधिकच उठून दिसतो. सातार्‍यापासून केवळ १२ कि. मी. अंतरावर हा किल्ला  आहे.
मुरुड- जंजिरा -
कोकणातील समुद्र किनार्‍यावरचा मजबूत, अजिंक्य व बलाढ्य जलदुर्ग म्हणून ‘मुरुड -जंजिरा’ हा ओळखला जातो. बुर्‍हानखान या हबशी सरदाराने इ. स. १५६७ ते १५७१ या काळात हा किल्ला  बांधला, अशी नोंद इतिहासात आढळते. प्रथम या किल्ल्याचे नाव ‘जंझिरे-मेहरूब’ होते. ‘झंझिरा’ (अरबी शब्द) म्हणजे बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. इ.स. १६१७ मध्ये सिद्धी घराण्याचा मूळ पुरुष सिद्धी अंबर याने मुरुड-जंजिरा येथील जहागिरी मिळवली. पुढील सुमारे ३२५ वर्षे हा किल्ला  सिद्धी घराण्याच्या ताब्यातच होता. चहुबाजुंनी पाणी असलेला हा किल्ला  वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, नाना फडणीस, इत्यादींनी हा जलदुर्ग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या सर्वांना अपयश आले. हा किल्ला  शेवटपर्यंत सिद्दींच्याच ताब्यात राहिला.

किल्ल्यामध्ये अनेक प्राण्यांची चित्रे कोरली आहेत. अरबी लिपीतील शिलालेख, ‘पंचायतन पीर’, बालेकिल्ल्यावरील वाडा, व अनेक तोफा तसेच अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर पाहावयास मिळतात. या किल्ल्यावरून संभाजीराजांनी बांधलेला पद्यदुर्ग किल्ला  दिसतो. किल्ल्यात जाण्यासाठी होडीचा वापर केला जातो. ४५० वर्षानंतरही ह्या किल्ल्याची स्थिती अगदी मजबूत आहे. जवळच मुरुड या गावी नवाबाचा प्रचंड वाडा आहे. रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर हा किल्ला  आहे. किल्ल्यात लोकवस्ती नाही. पण मुरुडला निवासाची सोय आहे.

लोहगड
-
पुण्यापासून जवळच असलेला लोहगड हा किल्ला  अनेक पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. लोहगड हा भक्कम किल्ला  आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारणत: १०२४ मी. आहे. गडावर प्रसन्न वातावरण आहे. गडावर असणार्‍या दाट जंगलामुळे येथील वातावरण खूपच थंड असते.

गडाची रचना ही प्राचीन असावी असे वाटते. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. पण पुरंदरच्या तहाच्या वेळी हा किल्ला  परत मोगलांकडे गेला. शेवटी १६७० मध्ये हा किल्ला  पुन्हा मराठ्यांनी जिंकला.

लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. तसेच गडावरून अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळतात. गडाच्या पायथ्याशीच प्रसिद्ध अशा कार्ले लेणी आहेत. मळवली स्टेशनपासून विसापूर व लोहगड हे दोन किल्ले दिसतात. राजा रविवर्मांनी सुरू केलेली भारतातील पहिली ‘लिथोप्रेस’ ही गडापासून जवळच आहे. कार्ला येथे पर्यटक निवास आहे.

शनिवारवाडा -
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवारवाडा हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. एके काळी संपूर्ण भारतातील राजकारणाचे केंद्र म्हणजे ही वास्तू होती. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली वाड्याची पायाभरणी केली. बाजीरावांच्या उत्तराधिकार्‍यांनी वाड्याचे बुरुज व दरवाजे बांधले, वाड्याचे बांधकाम पूर्ण केले. वाड्यात दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा इ. महत्त्वाचे दरवाजे आहेत. आरसे महाल, श्रीमंत पेशव्यांची बैठक, पाण्याचा हौद, सदाशिव भाऊंचे निवासस्थान, हजारी कारंजे, दिवाणखाना, पागा कार्यालय, रंगमहाल आदींचे अवशेष, इमारतींचे जोते (पायाची रचना) आज पाहण्यास मिळतात. वाड्यात असणार्‍या रंग महालाच्या काही खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

वाड्यात एक सात मजली, सात खणी इमारत होती. परंतु २७ फेब्रुवारी, १८२८ साली वाड्याला भीषण आग लागली व यात या सर्व वास्तू जळून खाक झाल्या. ही आग सतत सात दिवसांपर्यंत चालू होती. असे म्हणतात की, वाड्यात असणार्‍या सात मजली इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस दिसत असे. १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. थोरल्या बाजीरावांपासून नाना फडणवीसांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांचा अनुभव या वाड्याने घेतला. नोव्हेंबर, १८१७ मध्ये शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सध्या वाड्यात मुख्य दरवाजा व बुरुजांच्या भिंती अस्तित्वात आहेत. वाड्याच्या आतमध्ये गतकालीन वैभवाचे अतिशय कमी अवशेष आहेत. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्याबाहेर, समोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य चळवळ, पुण्यातील समाजसुधारणा चळवळ व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा अनेक चळवळींचा शनिवारवाडा अतिशय जवळचा साक्षीदार आहे.
Labels:

7 comments:

Unknown said...

Very good

Anonymous said...

हाय

NEWS MAHARASTRA said...

खूप छान माहिती सांगितली साहेब तुम्ही छत्त्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच्

VB Team said...

Khup chhan marathi stories

yogeshjadhav said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

खुप छान

Anonymous said...

🚩

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.