Marathit Logo लेणी ~ Marathit

लेणी

अजिंठा :
इ. स. पूर्व २०० ते इ. स. ६५० या काळात अजिंठा ( व वेरूळ) येथील लेणी कोरली गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.  रंगीत भित्ती चित्रे आणि लेणी यासाठी औरंगाबादेतील सोयगाव तालुक्यात असलेली अजिंठ्याची लेणी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे एकूण ३० लेणी बौद्धकालीन आहेत. बौद्धमंदिरे, गुंफा, गौतम बुद्धांच्या जीवनावर कोरलेले प्रसंग खडकांमध्ये कोरले आहेत. इंग्रज लष्करातील अधिकार्‍यांनी १८१९ साली ही लेणी शोधून काढली. अजिंठा गावापासून लेणी  सुमारे ११ कि. मी. अंतरावर आहेत.

लेणी व्यवस्थित बघता यावीत, पडझड होऊ नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. लेण्यांवर, धूर, धुराळा, पेट्रोल-डिझेल, हवा, पाऊस यांचा परिणाम होऊन ती खराब होऊ नयेत असा प्रयत्न केला जात आहे. प्रदूषण विरहित बसेसमधून पर्यटकांना लेणींपर्यंत जाता येते. स्वत:ची वाहने ४ कि. मी. अलीकडेच थांबवावी लागतात. औरंगाबादपासून सुमारे १०६ कि. मी. अंतरावर ही लेणी आहेत.

येथे दरवर्षी पर्यटन-उत्सवाचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतासह इतर अनेक देशांतील पर्यटक, अभ्यासकही येथे ‘कलेचा आनंद’ लुटण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात. येथील शिल्पांतून ‘तो’ काळ समोर उभा राहतो. हे प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या महायान पंथाशी जोडलेले स्थान आहे.

वेरुळ :
खुल्ताबाद तालुक्यात वेरुळ येथे ३४ लेणी आहेत. त्यात १२ बौद्ध, १७ हिंदू, आणि ५ जैन धर्मीय लेणी आहेत. ‘कैलास लेणे’ हे म्हणजे एका डोंगरात कोरलेले शिल्प आहे. जगभरातील पर्यटक ते एक आश्चर्य म्हणून पाहायला वारंवार येतात. ही लेणी राष्ट्रकूट राजा कृष्ण याने खोदली असे अभ्यासक मानतात. वेरुळजवळच घृष्णेश्र्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

धुमार लेणी, कैलास मंदिर, बुद्धांची प्रचंड आकराची मूर्ती, रामायण-महाभारतातील दृश्ये - आदी शिल्पाकृती येथे प्रेक्षणीय आहेत.

घारापुरी लेणी :
रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात घारापुरी या ठिकाणी लेणी आहेत. त्या लेण्यात एक प्रचंड मोठा हत्ती कोरलेला आहे. त्यावरून या लेणींना एलिफन्टा केव्हज् असे नाव पोर्तुगीजांनी दिले. या लेणी पाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रातून लॉंचने जाता येते. येथील दगडात कोरलेले महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय आहे.

उपरोक्त लेणींबरोबरच अतिशय प्राचीन अशी पितळखोरा लेणी (औरंगाबाद जिल्हा); कार्ले-भाजे व जुन्नर येथील लेणी (पुणे जिल्हा); उस्मानाबाद जिल्ह्यातील जैन लेणी, लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी व कान्हेरी गुंफा / लेणी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली) ही महाराष्ट्रातील लेणी प्रेक्षणीय असून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.