Marathit Logo कट्टा- एक व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा...... ~ Marathit

कट्टा- एक व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा......

नमस्कार....
परवा संध्याकाळी फोन आला आणि पलीकडून नेहमीचे शब्द कानावर आले " किती वाजता येणार आहेस?" मग काय नेहमीच्या सवयी प्रमाणे आमची स्वारी निघाली. घरात आलेल्या पाव्ह्ण्यानी कुठे निघालास असे विचारू नये असे वाटत असतानाच त्यांनी विचारले... मी काही बोलण्याच्या आधीच आमच्या बंधुराजांनी उत्तर दिले "कट्ट्यावर....." आणि कट्टा कुठे आहे हे सांगितल्यावर घरी आलेल्या पाव्हण्याच्या चेहेऱ्यावरचे भाव मात्र असे काही विचित्र झाले होते की जणू काही आत्ता हा(म्हणजे मी) खून करायला निघाला आहे.....

कट्टा हा शब्द एव्हढा बदनाम असण्याचे कारण काहीही असो... पण सगळेच कट्टे असे बदनाम का? मी पाहिलेल्या कट्ट्यांवर अनेक प्रकराची माणसे येत असतात... अशा कट्ट्यांवर काही "permanent आणि काही temporary member " असतात. माझे असे स्पष्ट मत आहे की कट्टा हे सुद्धा एक व्यसन आहे. माझ्या या मताला अनेक कट्टेकरी मान्य करतील. असे का? अनेक कट्टेकरींची मानसिक स्थिती काहीशी अशी असे......

"रोज कट्ट्यावर जाण्याची वेळ झाली अस्वस्थपणा वाढू लागतो आणि मग खिशातून फोन बाहेर काढला जातो आणि नेहमीच्या मित्रांकडे येणार असल्याची चौकशी करणारा संदेश पाठवला जातो. उत्तराची वाट बघता बघता निघण्याची तयारी होते... आणि मग................"

कट्टा ही काही फक्त तरुणाईची मक्तेदारी आहे असा समज करून घेण्याचे कारण नाही..... रोज संध्याकाळी कीर्तन अथवा भजन साठी जमणाऱ्या ६०-७० वर्षे वयाच्या आज्जी आजोबांसाठी मंदिर म्हणजे कट्ट्याचेच एक रूप आहे....कट्टा आपल्याला मनाने तरुण राहायला मदत करतो... असे जर नसते तर पुण्यातील फर्ग्युसन रस्ता हा वर्षनुवर्षे तरुणाईचा अखंड वाहणारा झरा म्हणून ओळखला गेला नसता....

कट्टा एक अशी जागा ज्या ठिकाणी आपली मते, आपले विचार आणि विचार करण्याची पद्धत ( thought process) एकतर अमुलाग्र बदलते किंवा अधिक पक्की होते. कट्ट्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असतात. विषय कोणताही असो पण सर्व बाजूंनी चर्चा होत असतात.मग विषय सोमोरून जाणारे सौंदर्य स्थळ असेल नाहीतर जागतिकीकरण असेल... पण कट्ट्यावर येणाऱ्या प्रक्तेकाची स्वतःची अशी काही मते असतात...ती चर्चेतून समोर आली की स्वतःची मते तपासून बघण्याची संधी मिळते...अर्थात दरवेळेला असे होतेच असे नाही... पण या जागेवर येण्याने(हो हो.... नुसत्या उपस्थितीने सुद्धा.....) आपल्या जाणीवा समृद्ध होतात. कट्ट्यावर अनेक मित्र भेटतात... कधीतरी असेही कळून जाते की आपल्या बरोबर नेहमी हसऱ्या चेहेर्याने वावरणाऱ्या मित्राला बऱ्याच समस्या आहेत.. आणि मग आपण आपल्या समस्यांचे रडगाणे गाण्यापेक्षा त्यांना हसतमुख राहून तोंड देण्याचा विचार करू लागतो.....कधी कोणाचे राहणीमान आपल्यावर प्रभाव पडून जाते तर कधी कोणाचे शब्द तर कोणाचे विचार..... एकमेकांची टांग खेचताना ( याला चांगल्या शब्दात मस्करी करणे म्हणतात...) आपण दिवसभराचा थकवा, कटकटी, भानगडी, व्याप तणाव ( म्हणजे tensions ) विसरून जातो. त्यावेळी " आत्ताचा क्षण जगणे" म्हणजे काय याचा अर्थ कळतो. कट्ट्यावर जाणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करताना असे लक्षात येते, की थोड्या दिवसात एकदम शामळू किंवा लाजाळू (याला काही जण एकलकोंडा वगैरे म्हणतील) व्यक्ती सुद्धा लोकांत व समाजात सहजपणे मिसळू लागला आहे...

कट्ट्यावर येणाऱ्यांसाठी कट्टा ही व्यक्तीमत्वात बदल घडवणारी जागा आहे अर्थात सोबतीला असणारी संगत ही पण या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचे काम करते. जर चांगली संगत असेल तर तरुणाई (तन आणि मन या दोन्ही अर्थांनी) च्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली जाऊ शकतात याची अनेक उदाहरणे आहेत पण त्याबरोबरच जर संगत चुकीची असेल तर चांगली मुले/मुली वाया जाऊ शकतात. कट्टा ही जागा अशी असते ज्या ठिकणी संगतीमुळे किंवा बघून बघून व्यसने लागण्याची शक्यता असते. याचा अर्थ असा नाही की कट्ट्यावर जाणारे सगळेच अगदी ठार व्यसनी असतात असे नाही.

ज्या लोकांना कट्टा नावाची काही तरी गोष्ट असते हे फक्त ऐकून माहित असते त्यांनी कोणत्याही कट्टेकरी व्यक्तीला सुधारला अथवा बिघडला असे कोणतेही विशेषण चिटकावण्याच्या फन्दांत पडू नये काहीही फायदा होणार नाही...... आणि कट्टेकरी लोकांनी व. पु. काळे यांचे एक वाक्य लक्षात ठेवावे. " माणूस बिघडला असे आपण म्हणतो याचा अर्थ तो माणूस आपल्याला हवे तसे वागत नाही......!!! "

आभार - - चेतन कुलकर्णी
[ई-मेल फॉरवर्ड ]
Labels:

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.