Marathit Logo समुद्रकिनारे, बंदरे ~ Marathit

समुद्रकिनारे, बंदरे

मुंबई - महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे तर समुद्रकिनार्‍यावरच वसलेले शहर आहे. समुद्रमार्गे, हवाईमार्गे आणि रेल्वेमार्गाने संपूर्ण भारताशी जोडले गेलेले हे शहर महाराष्ट्रातील राजकीय, व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्र आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणतात ते गेट वे ऑफ इंडिया हे ठिकाण मुंबईत समुद्रकिनारी उभारलेले आहे. अनेक गगनचुंबी व शिल्पकलायुक्त इमारती, प्रमुख शासकीय कार्यालये, विधानभवन, मंत्रालय, नेहरु विज्ञान केंद्र (तारांगण), डॉ. आंबेडकरांचे स्मारक (चैत्यभूमी, दादर), स्वातंत्र्यवीर सावरकारांचे स्मारक, मत्स्यालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक, मुंबई महापालिका भवन अशी महत्त्वाची ठिकाणे मुंबईत आहेत.
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे -
रायगड जिल्ह्यात समुद्रामुळे अनेक प्रेक्षणीय किनारे आहेत. अलिबाग, आक्षी-नागाव, किहीम हे किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. अलिबागचा किल्ला , उंदेरी-खांदेरी हे समुद्री किल्ले, पर्यटकांचे आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही तत्कालीन आरमार कसे सज्जतेने, सतर्कपणे समुद्री सीमांचे रक्षण करत असे हे समुद्रातील किल्ले पाहिल्यावर लक्षात येते. अलिबाग जवळच कनकेश्र्वर नावाचे टेकडीवरील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. (घारापुरी लेणी (एलिफंटा केव्हज्) या लेणी समुद्रमार्गे मुंबईहून जवळ आहेत, पण प्रशासकीय दृष्ट्या या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहेत.)
रेवदंडा (जि. रायगड) -
इ. स. १४७२ च्या सुमाराला समुद्र मार्गाने भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी अफनासी निकितान हा होता. त्याने रेवदंडा बंदरात जहाज आणले होते. त्याचे स्मारक रेवदंडा येथे उभारले आहे. या सुमारे ५३५ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व फार मोठे आहे. त्याने भारताच्या तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे सविस्तर वर्णन केले आहे. या ठिकाणी समुद्रकिनारा, स्मारक व आगरकोट हा भुईकोट किल्ला  - ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्र्वर, मुरूड-जंजिरा आदी समुद्रकिनार्‍यांची माहिती अन्य विभागंत दिलेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, वेळणेश्र्वर, मालगुंड, गणपतीमुळे, कशेळी, खुद्द रत्नागिरी, हर्णे, हेदवी अशी अनेक समुद्र किनार्‍याची ठिकाणे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग-विजयदुर्ग किल्ले, वेंगुर्ले आदी किनारे प्रसिद्ध आहेत.
Labels:

0 comments:

Post a Comment

 
या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले लेख, कविता, विनोद आणि इतर गोष्टी हे सर्व निरनिराळ्या माध्यमातून घेतले आहेत.