प्रेषक महेश शिऊरकर
Labels:
"महा"नेता
महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास, बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही. या काळात बाळासाहेबांनी अनेक वाद उभे केले आणि अनेक वादळांचा सामनाही केला. त्यांच्याशी झालेली ही बातचीत... त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत!
...............................
ती गणेशोत्सवाची अखेरची रात्र होती. दुसऱ्या दिवशी अनंताचं पूजन झाल्यावर, प्रसाद घेऊन गणराय परतीच्या प्रवासाला निघणार होते.
मुंबापुरीत उत्साहाचा एकच कल्लोळ होता. सगळी माणसं रस्त्यांवर अथवा गणरायाच्या मंडपात शेवटच्या दर्शनासाठी रीघ लावून उभी होती. गणेशोत्सव म्हटला की मराठी माणसाच्या जणू अंगातच संचारतं. त्यात शिवसैनिकच अग्रभागी असणार, हे तर गेले चार दशकं नित्यनेमानं बघायला मिळतंय. त्या रात्रीचं चित्रही तसंच होतं. अवघ्या मुंबापुरीला व्यापून उरलेल्या गणेश मंडळांभोवती शिवसैनिकांची तोबा गर्दी होती आणि अशा वेळी 'मातोश्री' हा वांद्याच्या कलानगरमधला बंगला मात्र पोलिसांच्या नेहमीच्या गराड्यात काहीसा सुस्तावलेला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती सुरक्षेचं कडक कवच उभं करण्यात आल्यापासूनच कलानगरची रया गेलीय. त्यात रात्री नऊनंतर तेथील वातावरण अगदीच एकाकी होत जातं. त्या रात्रीही त्यात काही फरक नव्हता. शिवाय त्या रात्री उद्धव ठाकरेही मुंबईत नव्हते. त्यांच्या पत्नीही बंगल्यावर नव्हत्या. अन्यथा कलानगरच्या त्या उदासवाण्या वातावरणातही 'मातोश्री' बंगला कसा उत्साहानं फुलून गेलेला असतो...
पण ही रात्र काहीशी वेगळीच होती.
त्यामुळेच 'मातोश्री'वरही काहीसं उदास सावट होतंच.
पोलिसांच्या तपासण्या ओलांडून बंगल्यात आत शिरल्यावरही माहोल बदललेला नव्हता. लिफ्टनं दुसऱ्या मजल्यावरच्या बाळासाहेबांच्या दालनात शिरताना, आता आतमधलं वातावरण कसं असेल, असाच प्रश्न मनात होता.
पण दालनात पाऊल टाकताच, आता सारा माहोल एकदमच बदलणार, याची साक्ष एका हातात चषक घेऊन बसलेल्या बाळासाहेबांच्या नजरेनेच दिली.
बाळासाहेबांच्या सोबतीला शिवाय एक चांगला मस्त खानदानी हुक्का होता. त्यातून ते सतत झुरके घेत होते.
वयोमानानुसार येणारा थकवा अपरिहार्य असला, तरी चेहरा मात्र प्रसन्न होता. डोळ्यांवर तोच नेहमीचा गॉगल होता. वेषही तोच. आपण छायाचित्रात पाहतो, तोच. म्हणजे भगवा आणि ते बोलायला लागल्यावर पहिल्यांदा ठळकपणे लक्षात आलं ते हे की, ऐंशीच्या उंबरठ्यावर उभे असतानाही बाळासाहेबांची स्मृती अगदी लख्ख आहे. गेल्या आठ दशकातल्या साऱ्या घटना त्यांना अगदी तारीख वारासह आठवताहेत. याची चुणूक त्यांनी अगदी संभाषण सुरू होता होताच दिली.
'मी मुलाखत रेकॉर्ड करणार आहे...' हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. पुढची दोन-पाच मिनिटं मग त्या सोपस्कारात गेली. 'शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये झाली...' असं वाक्य उच्चारताच '१९ जून' असं ते ताडकन उद्गारले आणि मुलाखत सुरू झाली...
शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये झाली. त्या आधी दहा वर्षं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या घरातून सुरू होती. याचा अर्थ बाळासाहेब, आपण गेल्या ५० वर्षांतील राजकारणाचे साक्षीदार आहात. त्या काळातील असंख्य नेते उदाहरणार्थ, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, मामा देवगिरीकर, शंकरराव देव यांच्यापासून एसेम, कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत... आज तुमच्यानंतरची जवळपास तिसरी पिढी राजकारण करत आहे. या पिढीशी डील करताना कसं वाटतं? जुन्या नेत्यांची आठवण येते का? राजकारणाची संपूर्ण शैली आणि संदर्भ बदलले आहेत का?
बाळासाहेब : या साऱ्या नेत्यांना विसरताच येणार नाही. शक्यच नाही. निदान मराठी माणूस तरी त्यांना विसरू शकेल, असं वाटत नाही...
ते खरंच आहे; पण आज तुमच्यानंतरची तिसरी पिढी राजकारणात आहे. या पिढीशी डील कसं करता? संवाद साधला जातो का?
कोवळी पोरं आहेत. त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे...
ती येतात, बसतात... बोलतात. त्यांना काही पुस्तकं वाचायला देतो. सावरकर आहेत, अत्रे आहेत. त्यांचं धगधगतं वाङ्मय आहे... ते वाचायला देतो. कादंबऱ्या नाही बरं का! (हसतात...)
या पिढीवर काही संस्कार करायला हवेत असं वाटतं का?
(प्रश्नाकडे दुर्लक्ष... पण बोलणं सुरूच. काहीसं मुक्त चिंतनासारखं...)
'गर्व से कहो हम हिंदू हैं!' असे उद्गार धर्मेंद्रजी महाराजांनी संभाजीनगरच्या एका भाषणात काढले होते....
विलेपार्ल्यात १९८७मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी हीच घोषणा घराघरांत नेली आणि त्या बळावरच शिवसेनेने ती निवडणूक जिंकली. त्यानंतरच महाराष्ट्रातलं हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं; कारण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्याची ओझरती आठवण त्यांना करून देण्याचा प्रयत्न केला. पण आता बाळासाहेब पूर्णपणे गतकाळात गेलेले... ते बोलतच राहतात....
त्या भाषणाच्या हजारोनी कॅसेट्स मी काढल्या. त्या मी तरुणांना वाटतो. इंदूरचा वसंत पोतदार. 'वंदे मातरम्' म्हणून त्याच्या भाषणाच्या कॅसेट्स होत्या... वारला बिचारा... या अशा कॅसेट्स मी तरुणांना वाटतो. हे असले धंदे मी करतो. 'शहाणे व्हा!' एवढंच माझं त्यांना सांगणं असतं. तरुणांच्या पिढीपासून मी बिल्कूलच दूर नाही. नुसता मी दिसलो, तरी त्यांना किती आनंद होतो!
राजकारणाचे बदलते संदर्भ, नव्या पिढीच्या हातात राजकारणाची सूत्रं जाणं आणि त्याचवेळी आपण विविध कारणांनी घरातच असणं, असं झालं आहे. हा घरातला वेळ आपण नेमका कसा घालवता? वाचन की काही जुने सिनेमा उदा. हॉलिवुड क्लासिक्स बघणं की आणखी काही... की नातवंडांचा अभ्यास घेता का?
मला घरात बसायची आवड नाही. 'हे विेश्वचि माझे घर...' असं जड वाक्य मी सांगत नाही. पण ही सगळी हतबलता आहे... प्रकृतीची. मला बद्धकोष्ठता आणि युरिनचा त्रास आहे. काय करणार? कुठे जाणार?
पण मग घरातला वेळ कसा घालवता?
अनेक लोक भेटायला येत असतात... काही बेकार संपादकही येतात! (हसतात) आणि गप्पांच्या मैफली रंगतात. कधी रामदास फुटाणे येतो. हसवून मजा करून जातो. कधी... कोण तो...? नायगावकर येतो. सर्व क्षेत्रांतले लोक येतात. कधी काही विद्वानही येतात! मजा येते.
पण काही सिनेमा, वाचन वगैरे?
मला बॉलिवुडबद्दल तिरस्कार आहे... पण सकाळी वर्तमानपत्रं बघतोच. सगळी मराठी वर्तमानपत्रं मी वाचतो... इंग्रजी वर्तमानपत्रं वाचून घेतो.
काही डोळ्यांचा त्रास वगैरे...?
डावा डोळा अलीकडे जरा त्रास देतो. ते एक गाणं आहे ना... (चालीवर गाऊ लागतात...) डावा डोळा पाण्यानं भरला... तसंच झालंय. पण मोतीबिंदू वगैरे काही नाही. सिनेमा मात्र मी बघत नाही... मला कुठे बाहेर जाताच येत नाही. माहीत आहे ना?
पण जायला कशाला पाहिजे... घरातच व्हीसीडी...
मला त्या सीडी व्हीसीडीची भानगड जमत नाही. त्यापेक्षा व्हीडिओ बरा! ही सीडी जिथं थांबायला नको तिथं अडकून थांबते... आणि मग रिवाईंड वगैरे... आणि मग लावली की पुन्हा सगळं (हातानं हवेत मोठ्ठा गोल काढतात!) 'कोलंबिया पिक्चर्स'पासून सुरू. शिवाय ते पिक्चर्स तरी कसले निव्वळ हाणामाऱ्यांचे... (हसतात...) 'हाणामाऱ्या' की
'हाणा नाऱ्या'? (हसतात...) 'सरकार' मात्र मी 'राजकमल स्टुडिओ'त जाऊन बघितला. नंतर मी असा आजारीच आहे. 'सरकार' बघितल्यामुळे नाही! पण काही ना काही तक्रारी आहेतच...
पण नातवंडं येत असतीलच ना!
येतात. प्रेम करतात. पाप्या देतात. पूर्वी कधी काळी त्यांच्याशी पत्ते खेळायचो. दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत हा खेळ चालायचा. इस्पिकवर इस्पिक, बदामवर बदाम... इस्पिकवर इस्पिक, बदामवर बदाम. गमतीचे खेळ असायचे. ज्याची जास्त पानं, तो जिंकला! शिवाय 'गुलामचोर'ही... पण त्यांचा अभ्यास मात्र आपण कधी घेतला नाही. ते आपले स्वत:च स्वत:चा अभ्यास करतात (हसतात) आया आहेत ना त्यांच्या! अभ्यासाची चौकशी मात्र करतो मी. चांगले मार्क्स मिळाले की येतात. मुलांचीही प्रगतिपुस्तकं मी बघायचो. पण मास्तरकीचे धंदे मात्र मी कधी केले नाहीत.
पण बाळासाहेब, तुम्ही पूर्वी कधी हॉलिवुडचे सिनेमे बघितले असतीलच ना?
हॉलिवुड... एकदम जबरदस्त. काय ते अभिनेते होते एकेक. गॅरी कुपर, जॉन वेन, इंग्रिड बर्गमन... तो कोण उंच? आमचा देव आनंद त्याची नक्कल करायचा! ग्रेगरी पेक. पण त्याच्याकडे फक्त उंची आणि आवाज होता. आमचा अमिताभ बघा. उंची. आवाज आणि आणि अॅक्टिंगही.
शिवसेनेच्या पहिल्या सभेत आपण 'राजकारणा'ची संभावना 'गजकरण' म्हणून केली होती, तरीही आपल्याला राजकारण करणं भाग पडलं. याचा अर्थ कोणतेही प्रश्ान्, समस्या मग त्या नागरी असोत की आर्थिक, सामाजिक असोत की कौटुंबिक... त्या सोडवण्यासाठी राजकारण अपरिहार्य आहे, असं आपल्याला वाटू लागलं... म्हणून आपल्याला राजकारणात पडावं लागलं?
होय! आम्ही राजकारणाचा उल्लेख गजकरण असा केला होता. पण मैदानी राजकारण आमच्यावर लादलंच गेलं. अन्यथा मी व्यंगचित्रकारच होतो. ज्या कुंचल्यानं अनेकांना थरथरायला लावलं, तोच कुंचला आता हातात धरला की हात थरथरायला लागतात. काय करणार?
आता व्यंगचित्रांचे विषय वाढलेत भरपूर. मी व्यंगचित्र काढायचं थांबवलं, त्या काळात, तेव्हा मॉडेल्सच नव्हती. मी थांबवलं आणि ते आले. कोण? सीताराम केसरी, राबडी देवी. नरसिंह राव हे व्यंगचित्रकारांसाठी उत्तम मॉडेल होते. पण त्यांचं चित्र मी कधी काढलंच नाही. तेव्हा थांबवलंच होतं मी.
....आणि हो! राजकारणाचं गजकरण आपणहून होत असतं. आपण त्याला आमंत्रण देत नसतो. तर तेव्हा मी फक्त मोर्चे काढायचो. आझाद मैदान ते काळा घोडा. आता काळा घोडा जिजामाता उद्यानात आहे. लक्षात घ्या, मी 'राणीचा बाग' म्हणत नाहीये. 'राणीचा बाग' फक्त गुलाम म्हणतात! दीडशे वर्षं गुलामीत काढलेली माणसं दुसरं काय म्हणणार?
तर मोर्चे काढून आमचं शिष्टमंडळ मग मंत्रालयावर जायचं. मंत्रीगणांना भेटायचं. बातचीत व्हायची. एक कप चहा आणि बिस्किटं मिळायची! तेव्हा लक्षात आलं मंत्री सिंहासनावर बसत नाही, तर आश्वासनांवर बसतो. पण मग बाहेर येताना मात्र अवसान घेऊन यावं लागायचं. जोरात भाषण करायचं. 'सरकारनं एक आठवड्याची मुदत दिली आहे. त्या काळात कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा मोर्चा काढू' वगैरे. पण पुढे कळून चुकलं की मोर्चे आणि आंदोलनं यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. मग काय सत्ताच घ्यायची! -आणि आम्ही राजकारणात ढकललो गेलो. भले आता आमचं राज्य नसेल; पण पुन्हा येणार आहे... आणि आता तर काय विचारूच नका. काय ते एक एक मंत्री. सगळं राजकारणच बुरसटलेलं झालंय...
मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक आपल्याला अभूतपूर्व यश देऊन गेली, त्याचं रहस्य आज ४० वर्षांनंतर सांगणार का? याच निवडणुकीत आपण प्रजा समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती. त्या आधी १९६७मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत स. का. पाटलांपासून अनेक काँग्रेस उमेदवारांचा पुरस्कार केला होता. शिवाय त्या पूर्वीही मार्मिकमधून काही विशिष्ट काँग्रेस नेत्यांचे कौतुक आपण वेळोवेळी करत होताच. हे राजकारण पुढे १९८०पर्यंत सुरू राहिले. पण मग पीएसपीवाल्यांशी आपलं पुढे इतकं फाटलं कसं... आणि त्यांना एकदम आपण 'मोडतोड तांबा पितळ'च्या भंगार बाजारात नेऊन कसं काय उभं केलंत...?
पहिल्यांदा आम्ही ठाणं जिंकलं. भगवा झेंडा प्रथम फडकला, तो ठाण्यात. मुंबई वगैरे त्यानंतर आणि मुंबई महापालिकेच्या १९६८मधील यशाचं रहस्य सांगायचं काय? लोकांनी मतं दिली, आम्ही निवडून आलो. आणि 'पीएसपी'शी (प्रजा समाजवादी पक्ष) केलेल्या युतीचा आम्हाला काय फायदा होणार होता? उलट तेच त्यामुळे जिवंत झाले! प्रमिला दंडवते त्यासाठी आल्या. त्यांना सांगितलं, मधूंशी बोलायला लागेल. ते आले. मी सांगितलं, यायचं तर या! तेव्हा राजकारणात ते कुठेच नव्हते आणि स. का. पाटलांबाबत बोलायचं, तर १९६७च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही राजकारणात नव्हतो. त्यामुळे स. का. पाटलांना मी पाठिंबा दिला होता. मुळात वसंतराव नाईक माझे मित्र होते. वसंतदादा, बाळासाहेब देसाई यांच्याशी माझे चांगले संबंध होते. (बाळासाहेब देसाई तेव्हा बरेच सिनिअर होते ना, असं मध्येच विचारल्यावर...) कसले सिनिअर हो? यांच्यात सिनिऑरिटी ही त्यांना मिळालेल्या पदांवर अवलंबून असते! नाही तर, बाकी सगळे नुसते 'काँग्रेसवाले'!
...आणि सांगून ठेवतो, यांचं कुणाचं कधी कौतुक-बिवतूक मी केलं नाही. उलट 'मार्मिक'मध्ये मी सगळ्यांची कार्टुन्स काढली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे एस. एम. जोशी, यशवंतराव, डांगे या सगळ्यांना मी जवळून पाहिलेलं होतं. यशवंतरावांवर मी जेवढे हल्ले केले, तेवढे बहुधा अन्य कोणीच केले नसतील! मुळात मला यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा 'मंगल कलश' आणला, हेच मान्य नाही. उलट मी त्यापूर्वी एक व्यंगचित्र काढलं होतं. एसेम, डांगे हे यशवंतरावांना दगड मारत आहेत आणि त्यानंतर ते दगड एकत्र करून यशवंतरावांनी त्यांची एक भिंत बांधली आहे, असं ते चित्र होतं. त्या भिंतीवर यशवंतरावांनी लिहिलं होतं 'संयुक्त महाराष्ट्र!' त्यानंतर १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला यशवंतराव बालमोहन विद्यामंदिरात आले. तेव्हा ते म्हणाले होते : 'बाळच्या कुंचल्याचे फटकारे अजूनही माझ्या पाठीवर आहेत. पण याच्याच कुंचल्यानं मला न्यायही दिला आहे...'
आता बाळासाहेब पूर्णपणे भूतकाळात हरवून गेलेले. १३ ऑगस्ट या तारखेमुळे त्यांना अत्र्यांची याद येते. 'अत्रे आमचे मित्र होते,' असं ते म्हणतात. पण त्यांच्याशी वादही झाला, असंही सांगायला विसरत नाहीत. जॉर्ज (फर्नांडिस) माझा चांगला मित्र होता... आहे. तो 'अजिंक्य निवास'मध्ये (म्हणजे 'डिमेलो हाऊस') कसा राहायचा, या आठवणीत ते गुंतून पडतात. पण लगेचच 'मला आत्मचरित्र सांगायचं नाही!' असंही ते खणखणीत स्वरात बजावतात... तरीही भूतकाळ त्यांना विसरता येत नाही आणि ते पुढे बोलतच राहतात...
आम्ही गिरण्यांच्या प्रश्नावरून उठाव केला. (तेव्हा अंतुले मुख्यमंत्री होते आणि शरद पवार विरोधी पक्षात) मोर्चा न्यायचं ठरवलं. तेव्हा शरदरावांचा (पवार) फोन आला. कोणीतरी काहीतरी करायला हवं. मी म्हटलं, मोर्चा तर नेऊ. येता का व्यासपीठावर, म्हणून विचारलं. आले. पवारांचा परत फोन आला. 'जॉर्ज म्हणतो, मला का घेतलं नाही?'. मी म्हटलं, नको रे बाबा! तो मोडतोड तांबा पितळवाला आहे. मग जॉर्जचाच फोन आला, 'बाळ, तू शरदला घेतलंस. मला का नाही?' मी तेच उत्तर दिलं. तो म्हणाला, 'मोडतोड तांबा पितळ म्हणजे काय?' त्यावर मी सांगितलं, मधू लिमयेला विचार! अखेर आम्ही गिरणी मालक संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेला. पण ते ऑफिस बंद करून पळाले होते. आमची मोडतोडीची एक संधी गेली. नाही तर सगळं मोडून टाकलं असतं! (हसतात)
मुंबईचं महापौरपद आपल्या हाती १९७०च्या आसपास आलं... त्याचवर्षी आपण परळमधली विधानसभा पोटनिवडणूकही जिंकली. दरम्यान महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या उदाहरणार्थ, स्थायी, बेस्ट, सुधार समित्यांची अध्यक्षपदंही शिवसेनेकडे आली होती. या चेअरमनशिपा, गाड्या, हारतुरे आणि मानसन्मान आदींमुळे शिवसैनिकांचं झटपट 'पुढाऱ्या'त रूपांतर होऊन गेलं, असं दिसतंय... चार दशकं मागं वळून पाहताना या साऱ्या 'खेळा'कडे आपण कोणत्या दृष्टीनं बघता...
हे शिवसेनेच्याच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत घडलं आहे. आता वाढदिवसाला कुणी आलं, तर त्याला काय, 'चला फुटा!' म्हणून सांगायचं काय? त्यानं हारतुरे आणले असतील, तर त्यांचा स्वीकार करावाच लागतो.
बाळासाहेबांशी बोलताना वेळेचं भान राहिलेलं नसतं. ते असंच बराच वेळ बोलतील, असं वाटत असतानाच, अचानक त्यांना ते भान येतं आणि ते एकदम 'आता आवरा!' असं सांगतात. खरं तर अनेक प्रश्न मनात असतात. शिवसेनेबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं हवी असतात. बाळासाहेबही दिलखुलासपणे बोलत असतात. पण आता त्यांनी वेळेचा इशारा दिल्यावर, मनातल्या सगळ्याच प्रश्नांची नव्यानं जुळवाजुळव करणं भाग असतं. अनेक प्रश्न आता गाळून टाकावे लागणार, अनेक शंका मनात तशाच उत्तराविना राहणार, हेही एव्हाना स्पष्ट झालेलंच असतं....
त्यामुळे मधला बराच इतिहास गाळून एकदम भारतीय जनता पक्षाशी झालेल्या युतीवर विचारायचं ठरवलं.
भाजपशी असलेली आपली युती हा कायम चचेर्चा विषय आहे. खरं तर संघपरिवाराचा कर्मठपणा हा आपल्या दिलखुलास स्वभावाला कधीही न मानवणारा आणि आपण त्याची यथेच्छ टवाळीही केली आहे. १९८४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं १९८५ची राज्य विधानसभा पवारांच्या पुलोदबरोबर लढवली, तेव्हा 'कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या' असं विधान केलं होतंत. पण पुन्हा आपण भाजपशीच युती केलीत. ती राजकीय यशासाठी की... 'हिंदुत्वासाठी' असं उत्तर आपण देणार हे गृहीत असलं, तरी जास्त काही बोलणार का?
शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका फार पूर्वीपासूनची आहे. १९२२पासून माझे वडील भास्करराव वैद्य यांच्याबरोबर हिंदुत्वाचं काम करीत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्तीवर 'हिंदू मिशनरी' यंत्रणा उभी करावी, असा त्यांचा इरादा होता. धर्मांतराला आळा घालण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी पडेल, असं त्यांना वाटत होतं. भाजपबरोबर युती झाली, त्यावेळीही माझी भूमिका स्पष्ट होती. प्रमोद महाजन आले. काय म्हणायचे त्यांना... हं... 'युतीचे शिल्पकार!' आले. बसले. चर्चा केली. ते म्हणाले, युती करू या! 'करूच!' मी म्हणालो. हे सगळं घडलं, तेव्हा मुख्य म्हणजे निवडणुका नव्हत्या. त्यामुळे युती हिंदुत्वासाठीच झाली होती. शिवाय गोळवलकर गुरुजींचे विचार होतेच. हिंदुत्वासाठीच 'आरएसएस'चा जन्म झाला, असं मी मानतो. आता रोज नवीन नवीन 'सुदर्शन चक्रं' निघताहेत! भाजपलाही कळत नाहीये काय करायचं ते...
पुढे १९९०च्या विधानसभा निवडणुकीतच खरं तर युतीच्या हाती सत्ता यायची; पण ते झालं नाही. नंतर ९५मध्ये सत्ता आली. ही सत्ता पुढच्याच निवडणुकीत नेमक्या कोणत्या कारणांनी गेली, असं आपल्याला वाटतं? कारण तेव्हा तर पवार बाहेर पडले होते आणि दोन काँग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. तरी पराभव पदरी आला आणि नंतर काँग्रेस आघाडी सरकारने अपेक्षा पूर्ण केलेल्या नसतानाही २००४मध्ये युती निवडून का येऊ शकली नाही... त्याचा परिणाम संघटनेवर मोठा झाला, असं वाटतं का?
या प्रश्नावर बोलणं ठीक वाटत नाही. अत्यंत घाणेरडी वर्तणूक केली गेली. अवघे १५ अपक्ष हवे होते. ते होतेही तयार. पण काही खुर्च्यांच्या हट्टापायी ते होऊ शकलं नाही.
पण २००४मध्ये तर सत्ता यायलाच हवी होती ना?
आमच्या युतीतील काहींचा कपाळकरंटेपणा भोवला. सत्ता आली नाही, ती त्यांच्यामुळेच. पण त्याचा संघटनेवर काहीही परिणाम झालेला नाही. बिल्कूल नाही. मुळात सत्ता हा आमचा ऑक्सिजन नाही... सिर है तो पगडी पचास.
सत्ता न आल्यामुळे खरंच संघटनेवर काही परिणाम झाला नाही?
नाही. बघा ना लोक किती अधिक प्रेम करू लागले आहेत. ईर्षेनं कामाला लागले आहेत.
पण भुजबळांसारखा एखादा मोठा नेता संघटनेतून जातो...
(ताडकन) त्यानंतरच आमची सत्ता आली, हे लक्षात घ्या ना! त्यामुळे काही परिणाम झाला असं कसं म्हणता? आणि मोठा नेता म्हणजे काय? शिवसेनेत असतो, तोवर मोठा!
आता प्रश्न आणि उत्तरं खटकेबाज होऊ लागलेली. बाळासाहेब पुन्हा वेळेचा इशारा देतात. त्यामुळे थेट नारायण राणे यांचा विषय काढल्याशिवाय गत्यंतर नसतं आणि बाळासाहेबही फटाफट बोलत असतात...
राणे एका मस्तीत गेला. त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. दोन बायांनी (प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा) त्याला गंडवलं आणि तो उपडा पडला. आता तर साधं महामंडळांवरही त्याच्या माणसांना घेतलेलं नाही.
हे होणारच आहे.
काँग्रेसनं आपला स्वार्थ साधला. त्याला वापरला आणि निरोधसारखा फेकून दिला...
पण कोकणातल्या चार जागा तर त्यांच्यामुळे गेल्या ना...
चार जागा कशा घेतल्या... ते ठाऊक नाही का? कलेक्टर बदलला. एस. पी. बदलला. (या पोटनिवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलेक्टर मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि लक्ष्मीबिदी प्रसन्ना या दाम्पत्यास एसपी आणि कलेक्टर म्हणून आणलं होतं) नवराबायको दोघं सगळं बघत होते. चांगली बडदास्त ठेवली जात होती... मग निवडणुका जिंकणार नाही तर काय...
मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून राणे यांना आणलं गेलं. पुढे राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि जोशी मात्र निष्ठेने काम करत राहिले. राणे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय चुकला, असं आता वाटतं का?
मनोहर जोशी का गेले तो आता मी बोलण्याचा विषय नाही... ते जाऊ दे! आणि राणे यांना मुख्यमंत्री का केलं, तर तेव्हा मुरंबा चांगला मुरला होता. त्यांना तेव्हा मुख्यमंत्री करायलाच हवं होतं. पण नंतर लगेचच निवडणुकांचा निर्णय झाला आणि त्यात सहा महिने आचारसंहिता लागू झाली. कारभार बंद. पण तरी त्यांनी सुधारणा बऱ्याच केल्या...
राणेंना मुख्यमंत्री केलं, नंतर विरोधी पक्षनेतेपदही दिलं... तरी ते सोडून गेले, असा मुद्दा होता. आता तो निर्णय चुकला, असं वाटतं का...
नारायण, माणूस मोठा सज्जन होता. निष्ठावंत होता. जे आहे, ते आहे. मी नाकारणार नाही. त्या वेळी, त्या क्षणाला तो योग्य निर्णय होता. तेव्हा दुसरं कोणी नव्हतं, सिनिअर. नारायण म्हणजे गुण-दुर्गुणांचं मिश्रण होतं. तसं ते सगळ्यांतच असतं. पण त्याला स्वत:ला सत्तेचा मोह झाला. विरोधी पक्षनेता असतानाही, त्याला सीएम व्हायची आस लागली. आता मी काय करायचं? विलासरावांना सांगायचं, व्हा बाजूला! मला नारोबाला तिथं बसवायचंय! आंधळाच झाला होता, निव्वळ तो. गडगंज संपत्ती कमावली त्यानं आणि त्या जोरावर सगळी नाटकं करत होता तो. आता तर काय, वसूल मंत्रीच झालाय तो....
राज ठाकरे यांचं भवितव्य काय असेल असं वाटतं?
मोठा पॉज. बाळासाहेब काहीसे स्तब्ध. दोन क्षण पूर्ण शांतता. मग एकदम ताडकन उद्गारतात...
त्यानं ज्या तिरीमिरीत उडी घेतली, त्याचं भवितव्य त्यानंच ठरवायचं...
पुन्हा मोठा पॉज.
आपण थोपवण्याचे प्रयत्न...
सगळे सोपस्कार झाले. तुम्ही नारायण, भुजबळ यांच्याशी त्याची तुलनाच करू नका. (पूर्णपणे ट्रान्समध्ये गेलेले...) राज हा आमच्या रक्तामांसाचा माणूस होता. माँच्या आणि आमच्या अंगाखांद्यावर खेळला, वाढला... या इथे 'मातोश्री'वर वाढला तो... सगळी पोरं एकत्र खेळायची... तो असा वागावा, याचं दु:ख अपार आहे. रोज विसरावं लागतं, पण विसरू शकत नाही...
त्याला कोण कानफुसके मिळाले, तेही मला माहीत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी त्याचे कान फुंकले.
तो इथपर्यंत जाईल, याची मला कल्पनाही नव्हती....
पुन्हा दोन क्षण थांबून बाळासाहेब 'आता पुरे' म्हणतात. तेव्हा शेवटचा प्रश्न.
महाराष्ट्राचं आणि विशेषत: मराठी माणसाचं भवितव्य यापुढच्या पिढीतल्या नेमक्या कोणत्या नेत्याच्या हाती सुरक्षित राहील, असं वाटतं?
आजचा विचार केला, तर शिवसेना सोडून अन्य कोणाच्या हाती मराठी माणसाचं भवितव्य सुरक्षित राहणार आहे? तरी लोकांनी पहिली पाच वर्षं पाहूनही पुन्हा पुन्हा त्यांनाच (काँग्रेस आघाडीला) निवडून दिलं. हे असले मतदार या देशात असावेत, हे पटतंच नाही...
पॉज...
मतदार कसा जागृत असायला हवा. पण इथं काय चाललंय? पैसे चारणं. गुंडांकडून धमक्या देऊन मतदान करून घेणं... हीच जर लोकशाही असेल, तर धिक्कार असो त्या लोकशाहीचा...
खरं तर महाराष्ट्राला हा 'माझा महाराष्ट्र' आहे, अशी आच, ईर्ष्या असायला हवी. साधे लोंढे थांबवता येत नाहीत तुम्हाला... हिजड्यांनो! संपूर्ण देशात कुठे कडक पावलं उचलली जाताहेत, असं जाणवत नाही. बांगलादेशी मुसलमान एवढे घुसले आहेत. त्यांचं वर्चस्व वाढतंय. बॉम्बस्फोट होताहेत. माणसं मरताहेत आणि आमचे आबा पाटील, कमिशनर अनामी रॉय 'आम्ही सज्ज आहोत, सज्ज आहोत...' म्हणून मिरवताहेत. बॉम्ब फुटला की सगळे चिडीचूप!
तरुणांना काय सांगणार...?
सरकारकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:चं संरक्षण स्वत:च करा. मुक्तपणे कोणत्या मार्गानं करायचं, ते तुमचं तुम्हीच ठरवा.
माझा आपल्याला आशीर्वाद!
बाहेर आल्यावर लक्षात येतं, बाळासाहेब खूपच बोलले. पण त्याहीपेक्षा खूप विचारायचं राहून गेलं... शिवाय काही प्रश्न बाळासाहेबांनी विचारूही दिले नाहीत. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना, आता महाराष्ट्राचं भवितव्य पवारांच्याच हाती सुरक्षित राहील, असे जाहीर उद्गार त्यांनी काढले होते. त्याची आठवण करून देताच ते संतापले होते. तरीही बाळासाहेब जे काही बोलले, त्याचं महत्त्व वादातीत होतं.
इतिहासाच्या एका मोठ्या साक्षीदाराची ही गवाही थोडीच होती? खरं तर एका अर्थानं ते त्यांचं मुक्तचिंतनच होतं... आणि मुलाखतीपेक्षाही ते चिंतनच महत्त्वाचं होतं; कारण तोच तर गेल्या चार दशकांचा इतिहास आहे... त्यांनीच घडवलेला आणि त्यांनाच दिसलेला!
-प्रकाश अकोलकर
(म.टा.)
http://www.manogat.com/node/8546

0 comments:
Post a Comment